
शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला.
जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्नी. शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी १६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शहाजीराजे (वडील).
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
जिजाबाई (आई).
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी दादोजी कोंडदेव ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
No comments:
Post a Comment